एस. पी. सिन्हा पाटणा : बिहारमध्ये जातिनिहाय जनगणनेवरून घडामोडींनी वेग घेतला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या मुद्यावर २७ मे रोजी सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे. इतर महत्त्वाच्या नेत्यांसोबत माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच नितीशकुमार यांनी सांगितले होते की, लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलविण्यात येईल. राज्यात जातिनिहाय जनगणनेची रुपरेखा कशी असायला हवी, यावर या बैठकीत चर्चा होईल. त्या आधारावर राज्य सरकार जनगणनेचे काम करेल. केंद्र सरकारच्या नकारानंतरही बिहार सरकारने घोषणा केली आहे की, जातीनिहाय जनगणना आम्ही आमच्या स्तरावर करू. जातिनिहाय जनगणनेवरून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हे सर्वपक्षीय बैठकीची मागणी करीत आहेत.
केंद्राने दिलेला नकारसर्वपक्षीय शिष्टमंडळाने नितीशकुमार यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. मात्र, केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेला नकार दिला होता. याबाबत लवकरच सर्वपक्षीय बैठक घेण्यात ठरले होते परंतु नंतरही ८ महिने काहीही घडले नाही. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यांच्यावर टीका केली होती.