कोणत्याही स्थितीत जातीनिहाय गणना करणारच, विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 07:22 IST2025-01-19T07:21:15+5:302025-01-19T07:22:10+5:30
आरक्षण मर्यादा ५०% पेक्षा अधिक होण्याची गरज

कोणत्याही स्थितीत जातीनिहाय गणना करणारच, विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे प्रतिपादन
- एस. पी. सिन्हा
पाटणा : काँग्रेस जातीनिहाय जनगणनेच्या बाजूने असून त्यात कुठलेही दुमत नाही. त्यामुळे कोणत्याही स्थितीत जातीनिहाय जनगणना करणार असल्याचे प्रतिपादन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. याच लोकसभेच्या कार्यकाळात जनगणना पूर्ण झालेली असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आजच्या आमदार व खासदारांकडे कुठलीही शक्ती नसल्याचा दावा करत गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली. पाटणा येथे शनिवारी आयोजित संविधान सुरक्षा संमेलनाला संबोधित करताना ते बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले की, देशाची व्यवस्था कोलमडत आहे. ती नीट करण्यासाठी जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता आहे. ज्यांची जेवढी संख्या, तेवढा त्यांना वाटा मिळणे आवश्यक असल्याचे गांधी म्हणाले. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही ५० टक्के आरक्षणाची भिंत पाडून टाकू. प्रत्येक जातीला या देशात वाटा मिळायला हवा.
तेजस्वी यादव यांच्यासोबत राहुल गांधी यांची चर्चा
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पाटणात पोहोचल्याबरोबर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना भेटण्यासाठी येथील हॉटेल मौर्यात दाखल झाले.
गांधी येणार असल्याने तेजस्वी अगोदरच हॉटेलमध्ये दाखल झाले होते. गांधी हॉटेलच्या गेटवर पोहोचल्याबरोबर तेजस्वी यादव यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर दोन्ही नेते तेजस्वींच्या खोलीत दाखल झाले.
तिथे राहुल गांधींना भेटण्यासाठी लालू प्रसाद यादवांचे संपूर्ण कुटुंब आले होते. काँग्रेस व राजद यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर राहुल व तेजस्वी भेट दोन्ही पक्षातील तणाव कमी करण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे.