नवी दिल्ली: बलात्कार आणि कास्टिंग काऊचवरुन प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी वादग्रस्त विधान केल्यावर आता यावरुन सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावर काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. 'प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होतं. संसददेखील याला अपवाद नाही,' असं चौधरी यांनी म्हटलंय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कास्टिंग काऊच प्रत्येक क्षेत्रात होतं, असंही चौधरींनी म्हटलंय.कास्टिंग काऊच फक्त चित्रपटसृष्टीत होतं असं नाही. असे प्रकार प्रत्येक क्षेत्रात होताहेत आणि हे कटू सत्य आहे, असं रेणुका चौधरी यांनी म्हटलं. 'संसदेत किंवा अन्य ठिकाणी असे प्रकार होत नाहीत, असं समजू नका. सध्या याबद्दल आवाज उठवला जात आहे. अनेकजणी कास्टिंग काऊचविषयी धैर्यानं बोलत आहेत. त्यांच्यावर झालेला अन्याय समोर येऊन सांगत आहेत,' असंही रेणुका चौधरी म्हणाल्या. सरोज खान यांनी बलात्कार आणि कास्टिंग काऊचबद्दल केलेल्या विधानानं सध्या खळबळ माजली आहे. चित्रपटसृष्टीत बलात्कार आणि कास्टिंग काऊच होतं असलं, तरी इथे रोजगारही मिळतो, असं खान यांनी म्हटलं होतं. ज्यांच्यासोबत असं घडतं त्यांना चित्रपटसृष्टीत सोडून देत नाही. उलट त्यांना काम दिलं जातं, असंही त्या म्हणाल्या. सरोज खान यांच्या विधानानं मोठा वाद झाला. त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीकाही झाली. यानंतर त्यांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागितली.
Casting Couch: संसदही कास्टिंग काऊचला अपवाद नाही- रेणुका चौधरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 4:16 PM