नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सापडलेले कबुतर सीमेपलीकडून हेरगिरीसाठीच पाठवले गेले असावे असा संशय व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा संस्था सतर्क झाल्या आहेत.
अधिकृत सूत्रांनुसार पाकिस्तानला खेटून असलेल्या आंतराराष्ट्रीय सीमेजवळ हे कबुतर सापडले. त्याच्या पायात एक कडी (रिंग) असून तिच्यावर काही गूढ भाषेत आकडे असल्याचा संशय आहे. हा काही कूट संदेश असू शकतो ही शक्यता फेटाळून लावता येत नाही. मात्र हा तपासाचा विषय आहे. परंतु आंतरराष्ट्रीय सीमा आणि संवेदनशील क्षेत्रात हे कबुतर पकडले गेलेले असल्यामुळे हे प्रकरण संशयास्पद दिसते.
गेल्या वर्षी पंजाबच्या हुसैनीवाला सेक्टरमध्ये तैनात बीएसएफ जवानांनीही भारत-पाकिस्तान सीमेवर तीन ड्रोन पाहिले होते. त्यानंतर बीएसएफने गोळीबार करून तिन्ही ड्रोनला पाकिस्तानच्या बाजूने हुसकावून लावले होते, असे प्रकार वारंवार घडत आहेत.
पोलीस काय म्हणतात ?
च्कठुआचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शैलेंद्र कुमार मिश्र म्हणाले होते की, कबुतराला हीरानगर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सीमेकडून उडताना पाहिले गेले होते. वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्यानेही मागील घटनांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी संशय व्यक्त केला. च्या आधीही सीमेपलीकडून कबूतर, मोठे फुगे आणि ड्रोन पाठवण्याचे प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा संस्था सतर्क झाल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी मे २०१७ मध्ये सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तानच्या सीमेला खेटून असलेल्या शाहपूर पोस्टवर एक कबुतर पकडले होते.