ऑनलाइन टीम
पाटणा, दि. १५ - बलात्कार व महिलांवरील अत्याचारांसाठी मोबाईल व मांसाहार कारणीभूत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे कला, संस्कृती व युवामंत्री विनय बिहारी यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलताना त्यांनी हे मत मांडले.
'तरूण मुले मोबाईलचा वापर अश्लील चित्रफिती पाहण्यासाठी करतात व त्यामुळे ते बलात्कार करण्यास उद्युक्त होतात' असा जावईशोध या मंत्र्याने लावला आहे. त्यामुळे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तरूणांच्या मोबाईलवर इंटरनेट सेवा देण्यास बंदी घातली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
एवढेच नव्हे तर 'मांसाहार करणा-या व्यक्तींकडूनच विनयभंग व बलात्काराच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे' असे सांगत या गोष्टींचा अतिरेक टाळला पाहिजे, असे विधान त्यांनी केले.
यापूर्वीही स्त्रियांवरील अत्याचारांबाबत अनेकांना वादग्रस्त मते मांडली होती. बलात्कार व विनयभंगांच्या घटनावाढीसाठी मोबाइल जबाबदार असल्याचा ठपका ठेवत कर्नाटक विधीमंडळाच्या समितीने शाळा व कॉलेजांमध्ये मोबाइलवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. राज्यांमध्ये महिलांसंबंधी गुन्हे वाढण्यास मोबाईल फोनचा अतिवापर विशेषत: स्मार्टफोनच्या साहाय्याने सोशल मीडिया नेटवर्कचा होणारा सहज वापर हे मुख्य कारण ठरत असल्याचेही म्हटले होते.