बंगळुरू : कावेरी पाणी वाटप वादामुळे तामिळनाडूतील शिवकाशी येथून कर्नाटकात येणाऱ्या फटाक्यांची आवक ठप्प झाली आहे. त्यामुळे येणारी दिवाळी शिवकाशी व बंगळुरू येथील व्यापारी-व्यावसायिकांसाठी अडचणीची ठरणार आहे. बंगळूरू आणि एकूणच कर्नाटकात दिवाळीत ९0 टक्के फटाके शिवकाशी येथून आणला जातो. शहरात २0 ठोक व्यापारी आहेत. कावेरी वादामुळे दोन्ही राज्यातील ट्रक वाहतूक थांबली असल्यामुळे ठोक व्यापाऱ्यांच्या फटक्यांच्या मागण्या अडकून पडल्या आहेत. तामिळनाडू-कर्नाटक सीमेवरील होसूर-अत्तिबेळे मार्गावरून फटक्यांच्या वाहतूक होते. तणावामुळे हा मार्ग सध्या दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला होता.दसरा संपला की ठोक व्यापाऱ्यांचा फटका व्यवसाय सुरू होतो. होसूर रोडवर स्टॉल लावले जातात. यंदाही स्टॉल लागले आहेत. तथापि, फटाकेच बाजारात न आल्यामुळे गिऱ्हाईकेही तिथे नाही. उत्तरेच्या राज्यांतून व बंगालमधून येणारे फटाके तुलनेने महाग असतात, अशी तक्रार स्टॉलचालक करीत आहेत. १२ सप्टेंबर रोजी बंगळुरू शहरात तामिळनाडूतील नोंदणी असलेल्या वाहनांवर हल्ले झाले होते. तेव्हा होसूर-अत्तिबेळे मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. बंगळुरूतील हा हिंसाचार थांबायला ७ आॅक्टोबर उजाडावा लागला होता. फटाके व्यावसायिक आणि गणेश ट्रेडर्सचे मालक मुनिराजू यांनी सांगितले की, दरवर्षी आम्ही १0 लाखांचे फटाके शिवकाशीतून खरेदी करतो. यंदा शिवकाशीतून एकही फटका आलेला नाही.(वृत्तसंस्था)
कर्नाटकात तामिळनाडूविरोधात वातावरण पेटविण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. आपल्या शत्रूचे फटाके खरेदी करू नका, असे आवाहन केले जात आहे. त्यामुळे व्यापारी धास्तावलेले आहेत. तरीही परिस्थिती निवळेल अशी अशा व्यापाऱ्यांना वाटते. ठोक व्यापारी नागराज यांनी सांगितले की, परिस्थिती सुधारत आहे. शिवकाशीहून काही प्रमाणात फटाके पाठविले जात आहे. आम्ही केलेल्या मागणीपैकी काही पुरवठा झाला आहे. येणाऱ्या काही दिवसांत आणखी माल मिळेल, असे वाटते. वातावरण निवळले नाही, तर मात्र आम्हाला मोठे नुकसान सोसावे लागेल. फेडरेशन आॅफ कर्नाटका चेंबर्स आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या एका अधिकाऱ्यानेही ही भावना व्यक्त केली.