नवी दिल्ली - दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या कावेरी नदीच्या पाणी वाटपाच्या प्रश्नाबाबत येत्या चार आठवड्यात निकाल सुनावणार असल्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. दक्षिण भारतामधून वाहत बंगालच्या उपसागराला मिळाणाऱ्या कावेरी नदीच्या पाण्यावरून कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. कावेरी नदीच्या पाणीपुरवठ्यावरून गेल्या दोन दशकांमध्ये खूप संभ्रम निर्माण करण्यात आला. कावेरी पाणीप्रश्नाबाबत चार आठवड्यांत निकाल सुनावल्यानंतरच कोणताही मंच कावेरी बेसिन संदर्भातील प्रश्न पुढे आणू शकेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. दोन दशकांपासून कर्नाटक आणि तामिळानाडूमधील वादाचे केंद्र बनलेल्या कावेरी नदीच्या पाणीवाटपाबाबत २००७ साली कावेरी पाणी लवादाने निर्णय दिला होता. मात्र हा निर्णय कुणालाही मान्य न झाल्याने कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या तिन्ही राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, या खटल्याबाबत दीर्घकाळ चाललेल्या सुनावणीनंतर २० सप्टेंबर २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. कावेरी पाणी वाटपाच्या वादावर सुनावणी करताना सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने, कावेरी पाणी वापपाच्या विवादाबाबत गेल्या दोन दशकांपासून खूप संभ्रमाची स्थिती राहिली आहे आता या प्रश्नाला कोणताही मंच निकाल आल्यानंतरच हात घालू शकतो. आम्ही येत्या चार आठवड्यात निकाल देऊ, असे सांगितले.
कावेरी पाणीप्रश्नी चार आठवड्यात सुनावणार निकाल - सर्वोच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2018 8:44 PM