लखनऊ : केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या आता तपास यंत्रणा राहिलेल्या नाहीत, तर त्या भाजपा आघाडीतील सहयोगी बनल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लालूप्रसाद यादव यांची भीती वाटत होती, म्हणूनच त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे, अशी टीका लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केली.
उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी यांच्यात आघाडी झाली आहे. ही आघाडी केल्याबद्दल तेजस्वी यादव यांनी बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांचे अभिनंदन केले.
त्यानंतर ते म्हणाले की, उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी हे दोनच पक्ष भाजपाचा पराभव करण्यासाठी सक्षम आहेत. या दोन्ही पक्षांची आघाडी देशहितासाठीच आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी अशा आघाडीची आवश्यकता होती. जे ब्रिटिशांचे गुलाम होते, तेच आज सत्तेत आहेत, असा टोलाही यावेळी तेजस्वी यादव यांनी भाजपा लगावला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने आघाडी केली आहे. अखिलेश यादव आणि मायावतींनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यातील प्रत्येकी 38 जागा लढवणार असल्याची माहिती मायावतींनी दिली. तर दोन जागा मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत. याशिवाय अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांमध्ये दोन्ही पक्ष उमेदवार देणार नाहीत.