नवी दिल्ली : सीबीआयने रेल्वेच्या अधिकाऱ्याविरोधात मोठी कारवाई केली असून तब्बल २.६१ कोटी रूपयांची रक्कम जप्त केली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील रेल्वेचे प्रधान मुख्य साहित्य व्यवस्थापक आणि १९८८ बॅचचे IRSS (Indian Railway Stores Service) अधिकारी के. सी.जोशी यांना सीबीआयने अटक केली आहे. तीन लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली सीबीआयने त्यांना अटक केली असून छापेमारीत २.६१ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
माहितीनुसार, सोमवारी गोरखपूरस्थित मेसर्स सुक्ती असोसिएट्सचे मालक प्रणव त्रिपाठी यांच्या तक्रारीनंतर आरोपी अधिकारी केसी जोशी याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता. अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयने मंगळवारी सापळा रचून आरोपी जोशीला तक्रारदाराकडून लाच घेताना रंगेहात पकडले. यानंतर सीबीआयने आरोपींच्या गोरखपूर आणि नोएडाच्या सेक्टर-५० येथील सरकारी निवासस्थानांची झडती घेतली आणि २.६१ कोटी रुपये जप्त केले. एफआयआरनुसार, सरकारी अधिकारी आणि आरोपी जोशीने गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (GEM) पोर्टलमधून त्रिपाठी यांच्या फर्मची नोंदणी रद्द करू नये यासाठी सात लाख रूपयांची लाच मागितली होती.
दरम्यान, एफआयआरमध्ये नमूद माहितीनुसार, प्रणव त्रिपाठी यांना जानेवारीमध्ये GeM पोर्टलद्वारे NER मध्ये तीन ट्रकच्या पुरवठ्यासाठी निविदा प्राप्त झाली होती. मात्र, आरोपी के.सी जोशी याने प्रणव यांना सात लाख रुपये न दिल्यास त्यांच्या फर्मची नोंदणी रद्द करण्याची धमकी दिली होती. यानंतर त्रिपाठी यांनी जोशी याच्याविरोधात तक्रार दाखल केली अन् सीबीआयने सापळा रचून कारवाई केली.