नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रधान सचिवांच्या कार्यालयावर सीबीआयने छापे मारल्याच्या मुद्यावर बुधवारी लोकसभेत लागोपाठ दुसऱ्या दिवशीही गदारोळ झाला. सीबीआय ही तपास संस्था स्वतंत्र राहिली नसून ती गुजरात ब्युरो आॅफ इन्व्हेस्टिगेशन (जीबीआय) बनली आहे, असा आरोप करीत तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी आम आदमी पार्टीला (आप)जोरदार साथ दिली.सीबीआयच्या छाप्यांमुळे आम्ही उद्विग्न झालो असून पंतप्रधान मोदींना माहीत असल्याखेरीज ही कारवाई झालेली नाही, असे तृणमूलचे सदस्य सुदीप बंडोपाध्याय यांनी म्हटले. त्यावर संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी आरोप फेटाळून लावला. केजरीवालांवर छापे मारण्यात आलेले नाही. कायदा आपले काम बजावत आहे, असे ते म्हणाले. गुजरातच्या कॅडरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची सीबीआयमध्ये नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी मोदींशी संबंधाची माहिती दिली आहे. ही तपास संस्था जीबीआय बनली आहे, असे बंडोपाध्याय यांनी म्हटले. पंतप्रधान मोदी यांना केजरीवालांनी भ्याड आणि मनोरुग्ण म्हटल्याबद्दल नायडूंनी तीव्र नापसंती दर्शविली. मुख्यमंत्री अशा प्रकारचे हीन विधान करू शकतात काय? असा टोलाही नायडू यांनी हाणला.(लोकमत न्यूज नेटवर्क)मोदींनी भागविली मान यांची तहान...लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी स्थगन प्रस्ताव फेटाळताच संतप्त झालेल्या आपच्या सदस्यांनी हौदात उतरत जोरदार घोषणाबाजी केली. त्याला काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी साथ दिली. आपचे सदस्य भगवंत मान अधिकच आक्रमक बनले होते. हातात कागद फडकवत ते मोदींच्या आसनासमोर येत ‘प्रधानमंत्री गद्दी छोडो’ अशा घोषणा देत होते.बराच वेळ ओरडल्यामुळे त्यांचा घसा सुकला होता. त्यातच त्यांना खोकल्याची उबळ आल्यामुळे पाणी हवे होते. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे पाणी पिण्यासाठी ते लोकसभा सचिवालयाच्या टेबलवर ठेवलेल्या ग्लासकडे वळत असताना पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासमोर पाण्याचा ग्लास धरला. मान यांनी घाईने ग्लास घेत तहान भागविलीग्लास परत करताना दोघेही हसले. मोदींनी ग्लासवर झाकण ठेवले आणि सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. मोदींनी सशक्त संसदीय लोकशाहीचे अनोखे उदाहरण घालून दिले होते. मान यांनी मोदींना धन्यवाद देत शिष्टाचार पाळला. मान यांनी पुन्हा ‘प्रधानमंत्री गद्दी छोडो, बदले की राजनीती नही चलेगी’ अशा घोषणा चालू ठेवत अन्य सदस्यांना साथ दिली.
सीबीआय बनली मोदींची ‘जीबीआय’; विरोधकांचा हल्ला
By admin | Published: December 17, 2015 1:09 AM