नवी दिल्ली : देशात आमची सत्ता आल्यानंतर सीबीआय हिंस्त्र व मोकाट जनावराप्रमाणे काम करू लागले आहे, अशा शब्दांत भाजपाचे नेते विनय कटियार यांनी स्वपक्षावर तोंडसुख घेतले आहे.बाबरी मशीद खटल्यात भाजपानेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार यांच्यासह अनेकांवर नव्याने गुन्हेगारी आरोप दाखल करण्यात यावे, अशी विनंती सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर विनय कटियार यांनी टीका केली. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करू, प्रसंगी तुरुंगातही जाऊ, पण आमच्यापैकी कुणीही मशीद पाडली नव्हती, असे त्यांनी सांगितले.बाबरी मशीद पाडण्याचा कट कुणीही रचला नसताना, सीबीआयची भूमिका हा आमच्याविरुद्ध कटच आहे. सीबीआय हिंस्त्र जनावरासारखे वागत आहे. उच्च न्यायालयाने कोणालाही दोषी ठरवले नव्हते. अडवाणी यांना राष्ट्रपतीपद मिळू नये, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआयमार्फत कट रचल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला होता. त्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, त्यांचे विधान खरे असू शकेल. दरम्यान, बाबरी मशीद माझ्या सांगण्यावरूनच कारसेवकांनी पाडली, असा दावा भाजपाचे माजी खासदार रामविलास वेदान्ती यांनी केला आहे. ते म्हणाले की, ६ डिसेंबर १९९२ रोजी काही कारसेवक मला येऊ न भेटले आणि मशिदीचे काय करायचे, असा प्रश्न त्यांनी मला केला. त्यावर मशीद पाडेपर्यंत मंदिर बांधताच येणार नाही, असे मी कारसेवकांना सांगितले, असा दावाही वेदान्ती यांनी केला आहे. वेदान्ती हे रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)नरसिंह राव यांना कल्पना होती?- राम मंदिर आंदोलनाचे काय होणार, असे मला तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी फोन करून विचारले होते. त्यांनाही मी कारसेवकांना दिलेल्या सूचनांची माहिती दिली होती, असा दावा करून ते म्हणाले की, मशीद पाडल्याबद्दल मी फाशी जायलाही तयार आहे. राव यांना मशीद पाडली जाणार असल्याचे माहीत होते, असा अर्थ निघतो. अर्थात, तसा दावा करणाऱ्या वेदान्ती यांचे नाव आरोपींमध्ये नाही.
सीबीआय हिंस्त्र जनावरासारखे वागत आहे!
By admin | Published: April 23, 2017 12:50 AM