नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर उपनिरीक्षकांच्या (Sub Inspector) भरतीतील कथित अनियमिततेबाबत सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयची पथके देशातील 33 ठिकाणी छापे टाकत आहे. आज म्हणजेच मंगळवारी जम्मू-काश्मीर एसएसबीचे माजी अध्यक्ष खालिद जहांगीर यांच्या परिसरासह 33 ठिकाणी सीबीआयची छापेमारी सुरू आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, जम्मू -काश्मीर सेवा निवड मंडळाचे (जेकेएसएसबी) परीक्षा नियंत्रक अशोक कुमार यांच्या निवासस्थानी सुद्धा झडती घेतली जात आहे. राजधानी दिल्लीसह देशभरात 33 ठिकाणी सीबीआयने हे छापे टाकले आहेत. सीबीआयकडून जम्मू, श्रीनगर, हरयाणातील करनाल, महेंद्रगड, रेवाडी; गुजरातमधील गांधीनगर, दिल्ली, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि कर्नाटकातील बंगळुरू येथे छापे टाकण्यात येत आहेत.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कथित अनियमिततेच्या तपासासंदर्भात सीबीआयकडून टाकण्यात आलेल्या छाप्यांची ही दुसरी फेरी आहे.दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी एफआयआर नोंदवल्यानंतर सीबीआयने सांगितले होते की, जम्मू-काश्मीर पोलिसांमधील उपनिरीक्षकांच्या पदांसाठी गेल्या मार्च महिन्यात जम्मू-काश्मीर सेवा निवड मंडळाने (जेकेएसएसबी) घेतलेल्या लेखी परीक्षेत अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या विनंतीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5 ऑगस्टला टाकले होते छापेअधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, उपनिरीक्षकांच्या भरती घोटाळ्याप्रकरणी जम्मू -काश्मीर सेवा निवड मंडळाचे सदस्य नारायण दत्त, मध्यस्थ आणि उमेदवारांसह 32 लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी जम्मूमधील 28 ठिकाणी आणि श्रीनगर आणि बंगळुरूमध्ये प्रत्येकी एक ठिकाणी छापे टाकण्यात आले. सीबीआयने एफआयआरमध्ये जम्मूमध्ये तैनात असलेले वैद्यकीय अधिकारी करनैल सिंग, अखनूर येथील 'कोचिंग सेंटर'चे मालक अविनाश गुप्ता आणि बंगळुरूस्थित कंपनीचे नावही नोंदवले आहे.