ऑनलाइन लोकमत
जबलपूर, दि. ५ - भ्रष्ट अधिका-याने गैरमार्गाने कमावलेला पैसा त्याचे कुटुंबिय वापरत असतील तर ते सुद्धा तितकेच दोषी आहेत असा निकाल जबलपूरच्या सीबीआय न्यायालयाने दिला आहे. ९४ लाख रुपयांच्या निधीचा घोटाळा केल्या प्रकरणी सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारच्या सेवेतील अधिकारी सूर्यकांत गौर यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा आणि सूनेला पाचवर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
त्याशिवाय न्यायालयाने प्रत्येक दोषीला अडीच लाख रुपयाचा दंडही ठोठावला आहे. दोषी सुर्यकांत डिफेन्स डिपार्टमेंटमध्ये अकाऊंटट होता. सुर्यकांतवर ९४ लाखांचा निधी पत्नी विनिता, मुलगा शिशिर आणि सून सुनिता गौर यांच्या बँकखात्यावर जमा केल्याचा आरोप होता.
सीबीआयने १४ जुलै २०१० रोजी गौरच्या घरावर धाड टाकली त्यावेळी ९४ लाखाच्या व्यवहाराची नोंद मिळाली. या व्यवहाराचा सुर्यकांतच्या उत्पनाशी ताळमेळ बसत नव्हता. त्या पुराव्यांच्या आधारे सुर्यकांत विरोधात गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणी सुर्यकांतच्या कुटुंबातील चौघांना तुरुंगवास झाल्यानंतर शिशिरचा पाचवर्षांच्या मुलाचे हाल होणार होते. कुटुंबियांच्या विनंतीवरुन या मुलालाही तुरुंगात हलवण्यात आले आहेत. भ्रष्टाचार रोखणा-या कायद्यामध्ये काही अशा तरतुदी आहेत ज्यामध्ये कुटुंबियांनाही शिक्षा होऊ शकते अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.