नवी दिल्ली : लोकपाल विधेयकातील सुधारणेबाबत आम्हाला सीबीआय आणि केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) सूचना, मते आणि शिफारशी कळविल्या असून आम्ही त्याबाबत अभ्यास करीत आहोत, असे लोकपालसंबंधी संसदीय समितीचे अध्यक्ष ई.एम. सुदर्शन नतचिप्पन यांनी सांगितले.आमच्या समितीने लोकपाल विधेयकातील प्रस्तावित सुधारणांबाबत जाहिरातींमधून वैयक्तिक पातळीवर, तसेच विविध संघटनांकडून सूचना आणि शिफारशी मागितल्या होत्या. त्यांचा आढावा घेतला जात आहे. एकेक सूचना आणि शिफारशींवर आम्ही विचार करीत आहोत. त्यासाठी आम्ही विशिष्ट मुदत निश्चित केलेली नाही, असे ते म्हणाले. कार्मिक, जनतक्रारी, कायदा आणि न्याय या मंत्रालयाचे संसदीय समितीत ३१ सदस्य असून, लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक २०१४ मध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत.गेल्या वर्षी ८ डिसेंबर रोजी हे विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले होते. २५ मार्चपर्यंत या समितीला अहवाल सादर करायचा होता. कार्मिक व प्रशिक्षण विभागाकडून प्रस्तावित बदलाबाबत माहिती पुरविली जात आहे. लोकपाल मंडळात नियुक्त केल्या जाणाऱ्या प्रसिद्ध विधिज्ञांचा कालावधी निश्चित करण्यासह सरकारी नोकरांकडून माहिती मागविण्यासारख्या तरतुदींवरही विचार केला जात आहे, अशी माहिती नतचिप्पन यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सीबीआय, सीव्हीसीने लोकपालबाबत मांडली मते
By admin | Published: February 22, 2015 11:02 PM