ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयने आपल्याच माजी प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बहुचर्चित कोळसा घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने आपले माजी प्रमुख रंजित सिन्हा यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या संचालकपदावर असताना कोळसा घोटाळ्याचा तपास प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
सीबीआयच्या आतापर्यंतच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच या संस्थेच्या माजी प्रमुखांवर गुन्हा नोंदवण्याची नामुष्की सीबीआयवर आली आहे. याआधी सीबीआयचे माजी प्रमुख ए.पी. सिंग यांच्याविरोधात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात मांस निर्यातक मोईन कुरैशी यांची बाजू घेतल्याच आरोप आहे.
तीन महिन्यांपूर्वीच सीबीआयने सिन्हा यांच्या चौकशीचे आदेश दिले होता. सिन्हा यांनी सीबीआयच्या प्रमुखपदी असताना आपल्या पदाचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने म्हटले होते.