नवी दिल्ली: रोटोमॅक पेन्सचे उत्पादन करणा-या रोटोमॅक ग्लोबल प्रा. लि. या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विक्रम कोठारी यांनी कंपनीच्या नावे धंद्यासाठी सात सरकारी बँकांकडून घेतलेली सुमारे ३,७०० कोटी रुपयांची कर्जे थकविली असल्याचे उघड झाले असून केंद्रीय गुन्तचर विभागाने (सीबीआय) यासंदर्भात त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पंजाब नॅशनल बँकेतील ११,४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे प्रकरण ताजे असतानाच कोठारी यांची ही कर्ज बुडवेगिरी समोर आली आहे.कोठारी यांच्या कंपनीकडील थकित कर्जांचा आकडा ८०० कोटी रुपयांच्या घरात असावा, असा ‘सीबीआय’चा प्राथमिक अंदाज होता. मात्र कागदपत्रांची पाहणी केली असता ही थकित कर्जे सुमारे ३,७०० कोटी रुपयांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात मूळ कर्जांची रक्कम २,९१९ कोटी रुपये आहे. व्याज व दंडासह ती ३,६९५ कोटी रुपये होते, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.कोठारी यांच्या रोटोमॅक ग्लोबल कंपनीने ज्यांची कर्जे बुडविली आहेत त्यांत बँक आॅफ इंडिया. बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक आॅफ इंडिया, अलाहाबाद बँक आणि ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स या सात सरकारी बँकांचा समावेश आहे.कोठारी यांनी कंपनीच्या नावे धंद्यासाठी कर्जे घेतली. परंतु प्रत्यक्षात ते पैसे अन्यत्र वळवून त्यांनी बँकांची फसवणूक केली, असा सीबीआयचा दावा असून त्यासंदर्भात कोठारी व त्यांच्या कंपनीविरुद्ध फसवणूक, लबाडी व विश्वासघात यासारखे गुन्हे नोंदवून तपास सुरु केला आहे. याचाच भाग म्हणून सीबीआयने सोमवारी कोठारी यांच्या घरासह कानपूरमध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकून तपासणी केली. कोठारी यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यांची, त्यांच्या पत्नीची व मुलाची चौकशी सुरु आहे, असे सीबीआयचे प्रवक्ते अभिषेक दयाल यांनी सोमवारी सायंकाळी स्पष्ट केले.नीरव मोदी पाठोपाठ विक्रम कोठारी नावाचा आणखी एक उद्योजक बँकांना चुना लावून देशातून फरार झाल्याची बातमी रविवारी पसरली होती. स्वत: कोठारी यांनी त्याचा इन्कार केला. शिवाय सीबीआयने कानपूरमध्ये त्यांची चौकशी केली यानेही कोठारींचे पलायन ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.सीबीआयच्या एफआयआर पाठोपाठ अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) कोठारी व त्यांच्या कंपनीविरुद्ध मनी लॉड्रिंग कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. कोठारी यांनी बँकांकडून घेतलेली कर्जे अन्यत्र वळवून त्यातून बेनामी मालमत्ता व काळा पैसा केला का, याचा तपास केला जात आहे, असे ‘ईडी’च्या सूत्रांनी सांगितले.घोटाळा नव्हे, थकित कर्जेआपण कोणताही घोटाळा केलेला नाही. माझ्या कंपनीचे प्रकरण हे बँकांमधील थकित कर्जांचे आहे. बँकांनी माझ्या कंपनीला कर्जबुडवे घोषित केलेले नाही तर आमची कर्जे ‘एनपीए’ खात्यांत टाकली आहेत. त्याचे प्रकरण नॅशनल कंपनी लॉ ट्रॅब्युनलमध्ये प्रलंबित आहे. मी कर्जे घेतली आहेत व त्यांची मी लवकरच परतफेड करीन, असे निवेदन विक्रम कोठारी यांनी प्रसिद्धीस दिले.
सात बँकांची फसवणूक, रोटोमॅकच्या विक्रम कोठारींनी थकविली ३,७०० कोटींची कर्जे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 9:11 PM