नवी दिल्ली : गुजरातमधील एका व्यापाºयाकडून ५ कोटी रुपयांची खंडणी कथितरीत्या वसूल केल्याप्रकरणी सीबीआयने आपल्याच एका अधिकाºयावर गुन्हा दाखल केला आहे. या अधिकाºयाने ईडी आणि आयकर विभागाच्या कारवाईची धमकी देऊन ही वसुली केल्याचे सांगितले जात आहे.
गांधीनगरमध्ये त्यावेळी निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सुनील नायर यांनी व्यापारी शैलेश भट्ट यांच्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी मागील वर्षी फेब्रुवारीत किरीट मधुभाई पलाडिया यांच्यासोबत एक कारस्थान रचले. यात असाही आरोप करण्यात आला आहे की, आगामी काही दिवसांपर्यंत नायर याने सीबीआय कार्यालयाच्या लॅण्डलाईन फोनचा उपयोग करून पैसे मागितले होते.सीबीआयने असा आरोप केला आहे की, ५ फेब्रुवारी २०१८ रोजी भट्ट यांना सीबीआयच्या गांधीनगर कार्यालयात बोलविण्यात आले आणि बिटकॉईनच्या माध्यमातून काळा पैसा जमविल्याबाबत ईडी आणि आयकर विभागाच्या कारवाईची धमकी दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, काळ्या पैशाच्या मुद्यावर गप्प राहण्यासाठी नायर यांनी कथित १० कोटी रुपये मागितले होते. त्यानंतर ही रक्कम ५ कोटी करण्यात आली.