जमशेदपूर- पंजाब नॅशनल बँकेत 12 हजार 600 कोटी रुपयांच्या घोटाळ्यानंतर आता जमशेदपूरच्या कॉर्पोरेशन बँकेत 7 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय. जमशेदपूरमधल्या एका कंपनी रामनंदी इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडविरोधात सीबीआयनं 6.77 कोटी रुपयांचा फसवणुकीचा प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कॉर्पोरेशन बँक, झोनल ऑफिस पटनाचे सहाय्यक व्यवस्थापकांनी सीबीआयकडे फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर सीबीआयनं चुकीच्या दस्तावेजाच्या आधारे कर्ज घेऊन बँकेचं नुकसान केल्याच्या आरोपाखाली कंपनीसहीत सहा लोकांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सीबीआयच्या रांचीतल्या गुन्हे शाखेनं कंपनीच्या जमशेदपूरमधील कार्यालयं आणि आरोपींच्या घरांवर छापेमारी केली आहे.बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकांच्या मते, रामानंदी इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडनं शोरूम आणि सर्व्हिस सेंटरच्या नावाखाळी बँकेकडून 638 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. तर 359 लाख रुपये कॅश क्रेडिटच्या नावाखाली दिले होते. कॉर्पोरेशन बँकेच्या पटना झोनल कार्यालयानं 11 मार्च 2014 रोजी हे कर्ज वितरित केलं होतं. आरोपींनी बँकेला चुकीच्या दस्तावेजांच्या माध्यमातून सुरक्षेच्या दृष्टीनं तारण ठेवण्यासाठी भरपूर मालमत्ता दाखवली होती. त्यानंतर बँकेनं हे कर्ज मंजूर केलं होतं. परंतु काही दिवसांनंतर कंपनीनं कर्ज फेडण्यास नकार दिला. त्यामुळे तिला थकीत कर्जदारांच्या यादीत टाकण्यात आलं. बँकेनं रामनंदी इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अखोरी गोपाल, संचालक संजिता अखोरी, संचालक अखोरी निशांत, संचालक अखोरी नितेश आणि कॉर्पोरेशन बँकेचं मूल्यांकन करणारा अधिकारी संजय कुमारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीएनबीनंतर आता 'या' बँकेत कोट्यवधींचा घोटाळा, सीबीआयनं केला गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 5:37 PM