रायबरेली : उन्नाव बलात्कार पीडितेच्या अपघात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयची फॉरेन्सिक टीम शुक्रवारी पुन्हा घटनास्थळी दाखल झाली. तसेच, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 20 अधिकाऱ्यांची विशेष टीम गठीत करण्यात आल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे.
सीबीआयच्या 20 अधिकाऱ्यांची विशेष टीम गठीत करण्यात आली आहे. यामध्ये एसपी, एएसपी, डीएसपी, निरीक्षक आणि उपनिरीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व अधिकारी 30 जुलैला झालेल्या अपघात प्रकरण्याची चौकशी करण्यास मदत करणार आहेत, असे सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले.
दरम्यान, काल उन्नाव बलात्कार प्रकरणाशी जोडलेल्या सर्व पाच केसेस लखनऊ येथून दिल्लीत चालविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. गेल्या रविवारी झालेल्या भीषण अपघातामध्ये या प्रकरणातील पीडित तरुणी आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले होते. या पाचव्या प्रकरणाचा तपास 7 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. रविवारी झालेल्या या अपघातात अन्य दोघांचा मृत्यू झाला होता.