नवी दिल्ली : मणिपूरमध्ये ४ मे रोजी जमावाने दोन महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सीबीआयने तपास हाती घेतला असून तेथे फॉरेन्सिकची टीम पाठवण्यात येणार आहे. तसेच महिलांवरील अत्याचाराचा तपास करण्यासाठी महिला अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार असल्याचे सीबीआयमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.
या महिन्याच्या सुरुवातीला सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मणिपूरमधील या प्रकरणाचे पडसाद देशभर उमटले आणि या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता.
राज्य पोलिसांनी १८ मे रोजी अज्ञात सशस्त्र लोकांविरुद्ध थौबल जिल्ह्यातील नॉन्गपोक सेकमाई पोलिस ठाण्यात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मणिपूरमध्ये ३ मेपासून इम्फाळ खोऱ्यात बहुसंख्य मैतेई समुदाय आणि कुकी यांच्यात संघर्ष सुरू आहे. यात आतापर्यंत १५०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी मैतेई समुदायाने मोठी रॅली काढली. या रॅलीत पाच जिल्ह्यांतील हजारो लोकांनी भाग घेतला. ही रॅली इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील थांगमेबंद येथून सुरू झाली आणि पाच किलोमीटरचे अंतर कापून इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील हप्ता कांगजेयबुंग येथे तिचा समारोप झाला.
‘इंडिया’चे २१ खासदार पीडितांना भेटले -इंफाळ : मणिपूरमधील जातीय संघर्ष भारताची प्रतिमा डागाळत आहे आणि तो संपवण्यासाठी सर्व पक्षांना शांततापूर्ण तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा लागेल, असे मत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. इंडिया या विरोधी आघाडीच्या २१ खासदारांचे शिष्टमंडळ हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या दोनदिवसीय दौऱ्यावर शनिवारी येथे आले. विरोधी पक्षांच्या खासदारांचे एक शिष्टमंडळ हिंसाचारातील पीडितांना भेटण्यासाठी अनेक मदत शिबिरांना भेट देणार आहे.
हे शिष्टमंडळ दिल्लीहून विमानाने मणिपूरला पोहोचले. येथे पोहोचल्यानंतर शिष्टमंडळाने चुराचांदपूर येथील मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या कुकी समाजातील पीडितांची भेट घेतली. येथे अलीकडे हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. सूत्रांनी सांगितले की, लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई आणि इतर खासदारांचे पथक चुराचांदपूर येथील डॉन बॉस्को शाळेत उभारलेल्या मदत शिबिरात गेले होते.
राजकारणासाठी आलो नाही -आम्ही येथे जातीय हिंसाचारातील पीडितांना भेटण्यासाठी आणि समस्या समजून घेण्यासाठी आलो आहोत. हा हिंसाचार लवकरात लवकर संपावा आणि शांतता प्रस्थापित व्हावी, अशी आमची इच्छा आहे. मणिपूरमध्ये काय चालले आहे, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. आम्ही येथे कोणतेही राजकारण करण्यासाठी आलो नाही.- अधीर रंजन चौधरी, काँग्रेस नेते
हा दौरा निव्वळ दिखावा -जेव्हा मणिपूर पूर्वीच्या सरकारच्या काळात जळत होते तेव्हा त्यांनी संसदेत एक शब्दही उच्चारला नाही. जेव्हा मणिपूर अनेक महिने बंद असायचे, तेव्हा ते एक शब्दही बोलले नाहीत. मी अधीर रंजन चौधरी यांना विनंती करतो की, तेच शिष्टमंडळ पश्चिम बंगालमध्ये आणावे. जिथे महिलांवर अत्याचार होत आहेत. - अनुराग ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री