हरीश गुप्ता,
नवी दिल्ली- सीबीआय संचालक अनिल सिन्हा, इंटलिजन्स ब्युरोचे प्रमुख दिनेश्वर शर्मा आणि रॉप्रमुख राजेंद्र खन्ना आगामी डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाची नियुक्ती करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांनाच त्या पदावर प्रदीर्घ काळ कायम ठेवण्याचे वा यापूर्वी निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा नियुक्त करण्याचे धोरण मोदींनी अवलंबल्याने कार्मिक विभाग याबाबत मोदींकडून संकेत मिळण्याची वाट पाहत आहे. अंमलबजावणी संचालकाचे पद एक वर्षाहून अधिक काळ रिक्त ठेवल्यावर मोदींनी अखेर कर्नालसिंग यांना परत आणण्याचे ठरवले. ते आयपीएस असले तरी सचिव दर्जाचे अधिकारी नाहीत. तरीही सरकारने संचालक दर्जाचे अधिकारी करण्याचा निर्णय घेतला. कर्नाल सिंह हे कठोर अधिकारी समजले जातात. यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले असले तरी ते चांगले काम करण्याची आशा वाटते.सीबीआयबाबत बोलायचे झाले तर विद्यमान संचालक अनिल सिन्हा यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमीच आहे. एनडीए सरकारच्याच काळात त्यांची नियुक्ती झालेली असली तरी काही प्रसंगी त्यांचा निष्काळजीपणा आणि काही मुद्दे चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे पंतप्रधान कार्यालयाची त्यांनी नाराजी ओढवून घेतलेली आहे. काळा पैसा जाहीर करण्याच्या योजनेंतर्गत एक आरोपी राकेश बन्सल याचे २.३९ कोटी रुपये सीबीआयने जाहीर केल्याने पीएमओ नाराज आहे. बन्सल याने जामिनावर सुटताच आत्महत्या केलेली आहे. या योजनेत कोणत्याही स्थितीत नाव जाहीर केले जाऊ शकत नसताना, बन्सलचे नाव का जाहीर करण्यात आले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दिनेश्वर शर्मा व राजिंदर खन्ना हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नजीकचे समजले जातात. दिनेश्वर शर्मा यांनी त्यांच्या कारकीर्दीत खूपच चांगले काम केले, तर खन्ना यांच्या कामगिरीत उणीव आहे.>काय आहेत शक्यता?अधिकाऱ्याचा वारस निवडण्याची जी नेहमीची रीत आहे त्यानुसार काम सुरू आहे. त्यांना मुदतवाढ देण्याचा सरकारला अधिकार आहे; परंतु त्यांना तशी संधी मिळण्याची शक्यता नाही. गेल्या पाच महिन्यांत अनिल सिन्हा यांना अधिकृत कार्यक्रम वगळता पंतप्रधान मोदी यांची भेटही मिळाली नाही. सीबीआयचे विशेष संचालक आर.के. दत्ता हे सिन्हा यांचा वारस होण्याची मोठी शक्यता आहे.