'राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी सीबीआय, इडीचा गैरवापर'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:57 IST2018-07-23T23:56:33+5:302018-07-23T23:57:07+5:30
काँग्रेस नेते आनंद शर्मा यांचा केंद्र सरकारवर आरोप

'राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी सीबीआय, इडीचा गैरवापर'
नवी दिल्ली : राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी केंद्र सरकार सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय (इडी) यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे असा आरोप काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी सोमवारी राज्यसभेत केला.
सभागृहात शून्य प्रहरामध्ये हा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरामुळे देशात दहशत, भीती व अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच गुन्ह्यासंदर्भात सीबीआय, महसुल गुप्तचर यंत्रणा, इडी यांच्याकडून वेगवेगळे एफआयआर नोंदविले जात आहेत. त्याकडे केंद्र सरकार डोळेझाक करत आहे. राजकीय सुड घेण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर होता कामा नये. भ्रष्टाचार करण्यासाठी केलेली कृती व तसे करण्यासाठी घेतलेला अधिकृत निर्णय या दोन वेगळ््या गोष्टी आहेत. हा फरक घ्यायला हवा.
काही लोकांना अडकविण्यासाठी त्यांनी दिलेल्या जबाबाचा हवा तसा अर्थ तपास यंत्रणा काढत आहेत, असा आरोप शर्मा यांनी केला.
भाजपा खासदारांकडून जोरदार निषेध
हे सांगताना आनंद शर्मा यांनी कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख करणे मात्र टाळले. मात्र त्यांच्या या उद्गारांचा भाजप खासदारांनी जोरदार निषेध केला. केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी सांगितले की, शर्मा हे तपास यंत्रणांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
आपल्यावर अन्याय होत आहे असे ज्यांना वाटते त्यांना त्याविरोधात दाद मागण्याचे कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. असे असून देखील आनंद शर्मा तपासयंत्रणांचे खच्चीकरण का करत आहेत, अशी विचारणा राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही केली.