बेंगळुरू: वाढता जनआक्रोश आणि विरोधकांच्या दबावापुढे नमते घेत कर्नाटकातील सिद्धरमैया सरकारने अखेर राज्यातील तडफदार आयएएस अधिकारी डी.के. रवी यांच्या रहस्यमय मृत्यूची सीबीआयमार्फत चौकशीची शिफारस सोमवारी केली. हे प्रकरण दाबण्याचा अथवा कुणालाही वाचविण्याचा प्रयत्न नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले.मृत रवी यांचे आई-वडील, तसेच लोकभावनेचा आदर करीत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. डी.के. रवी यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी राज्यभरात ठिकठिकाणी लोकांनी आंदोलन पुकारले होते. दुसरीकडे विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांवर टीकेचा आसूड ओढला होता. चिघळते वातावरण लक्षात घेऊन काँग्रेस श्रेष्ठींनीसुद्धा त्यांच्यावर अप्रत्यक्ष दबाव आणला होता. गेल्या सोमवारी रवी त्यांच्या बेंगळुरू येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले होते. (वृत्तसंस्था)रवी यांच्या कुटुंबियांकडून निर्णयाचे स्वागतदरम्यान, मृत आयएएस अधिकारी डी.के. रवी यांच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. रवी यांच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी करीत विधानसभेसमोर धरणे दिली होती.
आयएएस रवी यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी
By admin | Published: March 24, 2015 2:19 AM