लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बालासोर रेल्वे दुर्घटनेबाबत मिळणारी वेगवेगळी माहिती, अपघाताच्या कारणांमागील विविध शक्यता व अधिकाऱ्यांकडून मिळणारी विविध माहिती लक्षात घेता या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस रेल्वे बोर्डाने केली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
अपघात रेल्वे सिग्नलसाठी महत्त्वाच्या असलेल्या ‘पॉइंट मशीन’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ प्रणालीत केलेल्या बदलामुळे झाला आहे. हे कोणी व कसे केले, याचा खुलासा चौकशीत होईलच. तसेच मोटरमनची यात कोणतीही चूक नसून, घातपाताच्या दृष्टीनेही तपास केला जाईल, असेही वैष्णव यांनी स्पष्ट केले.
मृतांची संख्या २७५
ओडिशा सरकारने मृतांची सुधारित संख्या २७५ असल्याचे स्पष्ट केले. काही मृतदेह दोन वेळा मोजल्याने आकडा वाढला होता. सविस्तर पडताळणी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर मृतांची संख्या २७५, तर जखमींची संख्या १,१७५ असल्याचे मुख्य सचिव पी. के. जेना यांनी स्पष्ट केले.
सुप्रीम कोर्टात याचिका
- बालासोर रेल्वे अपघाताची निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वातील तज्ज्ञांच्या समितीकडून चौकशी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका वकील विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
- तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व रेल्वेगाड्यांमध्ये कवच प्रणालीची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाला देण्याची मागणीही याचिकेत केली आहे.
बायडेन यांच्याकडून दुःख व्यक्त
अपघाताबाबत अमेरिकेचे अध्यक्ष जाे बायडेन आणि फर्स्ट लेडी जील बायडेन यांनी तीव्र दुःख व्यक्त केले.