बंगळुरू : जनता दल (एस) व काँग्रेसप्रणीत कुमारस्वामी सरकारच्या काळात झालेल्या फोन टॅपिंग आरोपांची सीबीआयकडून चौकशी करण्यात येईल. तशी मागणी काही काँग्रेस नेत्यांनीच केली होती, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.आपल्यासह सुमारे ३०० नेत्यांचे फोन कुमारस्वामी सरकारने टॅप केले होते, असा आरोप जनता दल (एस)चे माजी प्रदेशाध्यक्ष व बंडखोर आमदार ए. एच. विश्वनाथ यांनी केला होता. त्यावरून आता कर्नाटकमध्ये राजकीय वादळ निर्माण झाले आहे. या आरोपाची सीबीआयमार्फत चौकशी करून सत्य उजेडात आणा, अशी मागणी या राज्याचे माजी मुख्यमंंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनीही केली होती. त्याचाही येडियुरप्पा यांनी उल्लेख केला.फोन टॅपिंग प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर कडक कारवाई व्हावी, अशी कर्नाटकच्या जनतेची भावना आहे. त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आल्याचेही येडियुरप्पा यांनी सांगितले. तत्कालीन सरकारमधील गृहमंत्री एम. बी. पाटील, मल्लिकार्जुन खरगे यांनीही या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, या फोन टॅपिंग आरोपांचा माजी मंत्री डी. के. शिवकुमार यांनी इन्कार केला होता व त्यांनी कुमारस्वामी यांची बाजू घेतली होती. (वृत्तसंस्था)सिद्धरामय्यांचे निकटवर्तीय होते लक्ष्यकाँग्रेस व जनता दल (एस)चे आघाडी सरकार असताना समन्वय समितीचे प्रमुख सिद्धरामय्यांच्या निकटवर्तीयांचे फोन टॅप केले जात होते, असा आरोप बंडखोर आमदार ए. एच. विश्वनाथ यांनी केला होता. गुप्तचर यंत्रणा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकार कक्षेखाली येतात. त्यामुळे या टॅपिंग प्रकरणाची कुमारस्वामी यांना माहिती नव्हती हे संभवतच नाही, असेही त्यांनी म्हटले होते.
फोन टॅपिंग आरोपांची सीबीआय चौकशी - येडियुरप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 5:10 AM