कोलकाता/नवी दिल्ली: शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं बंगालमध्ये मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या प्रकारानंतर ममता बॅनर्जींनी केंद्र सरकार आणि सीबीआयविरोधात आंदोलनास सुरुवात केली आहे. तर कारवाईस अटकाव करण्यात आल्यानंतर सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संघर्ष गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. 2016 पासून हा संघर्ष सुरू झाला. केंद्र आणि राज्य सरकारमधील या संघर्षाची ठिणगी एका घोटाळ्यामुळे पडली. 2013 मध्ये हा घोटाळा उघडकीस आला. शारदा चिट फंड नावानं ओळखल्या जाणाऱ्या या घोटाळ्यात तृणमूलच्या अनेक नेत्यांची नावं समोर आली. सत्ताधाऱ्यांच्या आशीवार्दामुळेच हा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपानं अनेकदा केला. लोकसभा निवडणुकीत भाजपानं यावरुन वातावरण तापवलं. मात्र यानतंरही राज्यातील 42 पैकी 34 जागांवर तृणमूलचे उमेदवार विजयी झाले.मोदी सरकारनं शारदा चिट फंड घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे सोपवली आणि मोदी विरुद्ध दिदी हा वाद आणखी पेटला. 2016 मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळच्या प्रचारादरम्यानही भाजपानं पुन्हा हे प्रकरण लावून धरलं. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. या निवडणुकीत भाजपाच्या मतांमध्ये जवळपास 6.10 टक्क्यांनी वाढ झाली. मात्र ममतांच्या तृणमूल काँग्रेसच्या जागांमध्ये 27 नं वाढ झाली आणि त्यांनी 294 पैकी 211 खिशात घातल्या.
मोदी विरुद्ध दिदी; जाणून घ्या कुठे, कधी आणि कशी पडली वादाची ठिणगी?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 7:35 AM