नवी दिल्ली - देशातील मोदी सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका सातत्याने होत आहे. केंद्र सरकार ईडी आणि ,सीबीआयचा धाक दाखवून काँग्रेस आणि विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, अमित शहा यांनी उत्तर देताना काँग्रेसच्या काळात अशा घटना घडत होत्या. मी स्वत: गृहमंत्री असताना माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाव टाकण्यात येत होता, असा गौप्यस्फोटच शहा यांनी केलाय.
काँग्रेसच्या नेतृत्त्वातील युपीए सरकारने गुजरातमधील एका कथित चकमकप्रकरणी (फेक एन्काऊंटर) तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना अकडवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला होता. तेव्हा मी राज्याचा गृहमंत्री होतो, 'न्यूज़ १८ राइज़िंग इंडिया' या कार्यक्रमात घेतलेल्या मुलाखतीदरम्यान अमित शहा यांनी असा गौप्यस्फोट केला. सध्याचे पंतप्रधान आणि तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना अडकवण्यासाठी माझ्यावर सीबीआयच्या माध्यमातून दबाव टाकण्यात येत होता. मात्र, भाजपने कुठेही गोंधळ घातला नाही, किंवा त्याबाबत संभ्रम निर्माण केला नाही, असे शहा यांनी म्हटले. तसेच, राहुल गांधी हे एकमेव नेते नाहीत, ज्यांना न्यायालयाने शिक्षा दिली आहे किंवा ज्यांची खासदारकी गेली आहे, असेही ते म्हणाले.
राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोष देण्यापेक्षा आपण दोषी नाहीत, याबाबत वरच्या कोर्टात अपील करायला हवं. मात्र, त्यांनी अद्यापही तसं अपील केलं नाही, हे खूप अहंकारी आहेत, असेही अमित शहा यांनी म्हटलं.