नवी दिल्ली : पंजाबातील धान्य घोटाळ्याचा सीबीआयमार्फत तपास करण्याची मागणी काँग्रेसचे प्रतापसिंग बाजवा यांनी मंगळवारी राज्यसभेत करताच शिरोमणी अकाली दल आणि भाजपने विरोध केल्यामुळे राज्यसभेत जोरदार शाब्दिक चकमक झडली. खा. विजय दर्डा यांनी बाजवा यांच्या मागणीला समर्थन दिले.पंजाबात धान्य खरेदीत मोठ्या प्रमाणात निधीचा गैरवापर, गळती आणि धान्य वळते करण्याचे प्रकार होत असून पंजाब सरकार घोटाळ्यात अडकल्याचा आरोप बाजवा यांनी केला. शून्य तासाला हा मुद्दा उपस्थित करताना बाजवा म्हणाले की, बँकानी प्रकाशसिंग बादल यांच्या सरकारला गव्हाच्या खरेदीसाठी आगाऊ पतपुरवठा करण्याला नकार दिल्यामुळे हा घोटाळा उघडकीस आला आहे. हा घोटाळा २० हजार कोटींपेक्षा मोठा आहे. बाजवा यांनी कॅगच्या अहवालाचा दाखला देत पंजाब सरकार व धान्य माफियांमध्ये संगनमत असल्याचा आरोप केला. शिरोमणी अकाली दल व भाजपच्या सदस्यांनी बाजवा यांच्या विधानावर आक्षेप घेतला. त्यावर वाद झडत असताना उपसभापती पी.जे. कुरियन यांनी सदस्यांना समज दिली. (प्रतिनिधी)
‘धान्य घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा’
By admin | Published: May 11, 2016 3:17 AM