सुनील चावकेलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्लीचेमुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थानाचे नव्याने बांधकाम करताना झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कथित उधळपट्टी संबंधात प्राथमिक चौकशीची नोंद करून सीबीआयने याप्रकरणी बुधवारी पहिले पाऊल टाकले.
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याविरोधात आतापर्यंत ५० हून अधिक प्रकरणे नोंदवून चौकशी करण्यात आली आहे. दिल्ली सरकारला काम करण्यापासून रोखण्यासाठी, तसेच ‘आप’ला संपविण्यासाठी केंद्र सरकारने पूर्ण ताकद लावली असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.
काय आहे प्रकरण? मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या ६, फ्लॅग स्टाफ रोड, सिव्हिल लाइन्स या अधिकृत निवासस्थानाच्या नूतनीकरणाच्या कामात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी झाल्याचा काँग्रेस आणि भाजपने आरोप केला असून, त्यात झालेला खर्च आणि आर्थिक घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी नायब राज्यपालांकडे केली होती. त्यानुसार नायब राज्यपालांनी मे महिन्यात सीबीआयला पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. प्राथमिक चौकशीची नोंद केल्यानंतर सीबीआयने दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला बंगल्याच्या बांधकामाशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि फाइल्स ३ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्यास सांगितले आहे.