CBI Raid Karti Chidambaram : ही कितवी रेड? मी तर मोजणीच विसरलो! तीन राज्यांत धाडी पडताच कार्ति चिदंबरम यांचं ट्वीट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 10:24 AM2022-05-17T10:24:06+5:302022-05-17T10:32:44+5:30
CBI Raid Karti Chidambaram : माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ति चिदंबरम यांच्या घर आणि कार्यालयांवर सीबीआयनं छापे टाकले.
CBI Raid Karti Chidambaram : माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचे सुपुत्र खासदार कार्ति चिदंबरम यांच्या घर आणि कार्यालयांवर मंगळवारी सीबीआयनं छापे टाकले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयनं कार्ति चिदंबरम यांच्या विरोधात २०१०-१४ दरम्यान, कथित देवाण-घेवाण आणि पैसे पाठवण्यासंदर्भात नवीन गुन्हा दाखल केला आहे. मुंबई, दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये सात ठिकाणी हे टाकण्यात आले आहेत.
सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार्ति चिदंबरम आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात निरनिराळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एबीपी न्यूजनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. कार्ति चिदंबरम यांनी चिनी कंपनीच्या काही लोकांना व्हिसा मिळवून दिला होता. याच्या मोबदल्यात त्यांच्याकडून ५० लाख रुपये घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यावेळी पि. चिदंबरम हे गृहमंत्री होते. हे प्रकरण २०११ मधील आहे. छाप्यानंतर कार्ति चिदंबरम यांनी तपास यंत्रणेवर निशाणा साधला असून ही किती वेळा छापे टाकण्यात आले आहेत, मी मोजणीच विसरलोय. हा रेकॉर्ड असेल, असं ट्वीट चिदंबरम यांनी केलं आहे.
I have lost count, how many times has it been? Must be a record.
— Karti P Chidambaram (@KartiPC) May 17, 2022
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, सीबीआयने माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र आणि लोकसभा खासदार कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध बेकायदेशीर लाभाच्या आरोपाखाली नवीन गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली.