चंदीगढ: हरयाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या घरावर सीबीआयनं शुक्रवारी सकाळी छापा टाकला आहे. हुड्डा यांच्या रोहतकमधील निवासस्थानी सकाळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी हुड्डा घरातच होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या सीबीआयची कारवाई सुरू असून घरातील कोणालाही बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याशिवाय दिल्ली-एनसीआरमधील 30 हून अधिक ठिकाणी सीबीआयनं छापे टाकले आहेत. 2005 मध्ये असोशिएटेड जर्नल्स लिमिटेडला चुकीच्या पद्धतीनं जमीन देण्यात आली होती. त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी हुड्डा यांच्या विरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केल्याचं वृत्त टाईम्स नाऊनं दिलं आहे. सीबीआयनं भूपेंद्र सिंह हुड्डा, वरिष्ठ काँग्रेस नेते मोतीलाल वोरा आणि असोशिएटेड जर्नल्स लिमिटेडविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डांवर असोशिएटेड जर्नल्स लिमिटेडला पंचकुलामध्ये नियम डावलून जागा दिल्याचा आरोप आहे. असोशिएटेड जर्नल्स लिमिटेडकडून नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र चालवलं जातं. या प्रकरणाचा तपास भाजपा सरकारनं 2016 मध्ये सीबीआयकडे सोपवला. भाजपानं सत्तेत येण्याआधी यावरुन काँग्रेसवर जोरदार टीका केली. यानंतर सत्तेवर येताच या प्रकरणांची त्वरित चौकशी सुरू करण्यात आली. हरयाणा शहर विकास प्राधिकरणानं या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. राज्यात काँग्रेसची सत्ता असताना हुड्डा या प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष होते. त्यामुळे हुड्डा यांच्याविरोधातील कारवाईला वेग आला आहे.
हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डांच्या घरावर सीबीआयचा छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 11:28 AM