श्रीनगर : अनेक लोकांना बेकायदेशीर पद्धतीने बंदुकीसाठी परवाने जारी केल्याप्रकरणी सीबीआयने जम्मू-काश्मीर व दिल्ली येथील ४० जागांवर छापे घातले. त्यात जम्मू-काश्मीरमधील आयएएस अधिकारी शाहिद इक्बाल चौधरी यांच्या घराचाही समावेश होता.
सीबीआयने शनिवारी सकाळी काश्मीरमधील श्रीनगर, उधमपूर, राजौरी, अनंतनाग, बारामुल्ला येथेही काही जणांच्या निवासस्थानांवर धाडी टाकल्या. काश्मीरमधील वादग्रस्त आयएएस अधिकारी शाहिद इक्बाल चौधरी हे सध्या या केंद्रशासित प्रदेशाच्या आदिवासी खात्याचे सचिव आहेत. कठुआ येथे ते उपायुक्त, तर उधमपूर जिल्ह्यातही वरिष्ठ पदावर कार्यरत होते. या काळात त्यांनी इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील शेकडो लोकांना बोगस नावाने बंदुकीसाठी परवाने दिले असा आरोप आहे. या प्रकरणात आठ माजी उपायुक्तांची सीबीआयने आतापर्यंत चौकशी केली आहे. २०१२ सालापासून जम्मू-काश्मीरमधून २ लाखांपेक्षा जास्त बंदूक परवाने देण्यात आले.
पाळेमुळे खणून काढल्याचा दावा
गेल्या फेब्रुवारी महिन्यात सीबीआयने एका व्यक्तीला अटक केली होती. बनावट बंदूक परवाना घोटाळ्यातील आरोपींशी या व्यक्तीने मोठे आर्थिक व्यवहार केले होते. या घोटाळ्याची पाळेमुळे खणून काढल्याचा दावाही सीबीआयने केला होता. मात्र जम्मू-काश्मीरच्या तत्कालीन प्रशासनाने या आरोपींना काही प्रमाणात कायदेशीर संरक्षण दिले होते. परवाना घोटाळा जम्मू-काश्मीरच्या अधिकाऱ्यांनी केल्याचे लक्षात आल्यानंतर हे प्रकरण तेथील तत्कालीन राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी सीबीआयकडे तपासासाठी दिले.