नवी दिल्ली : विदेशी फंडिंग नियमांचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग आणि त्यांचे पती आनंद ग्रोव्हर यांच्या दिल्ली आणि मुंबईतील घरावर सीबीआयने गुरुवारी छापे टाकले असून अद्याप सर्च ऑपरेशन सुरू आहे.
'लॉयर्स कलेक्टिव्ह' या स्वयंसेवी संस्थेसाठी विदेशातून फंडिंग घेऊन निधी विनियमन कायद्याचे (एफसीआरए) उल्लंघन केल्याचा इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोव्हर यांच्यावर आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
2009 ते 2014 मध्ये इंदिरा जयसिंग अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होत्या. त्यावेळी स्वयंसेवी संस्थेसाठी विदेशी निधी गोळा करताना नियमांचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयकडे इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोव्हर यांच्याविरोधात केस दाखल करण्यात आली होती. तसेच, केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याच्या या स्वयंसेवी संस्थेचा परवानाही रद्द केला होता.