नवी दिल्ली : आयडीबीआय बँकेतून घेतलेले सुमारे ९०० कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याच्या प्रकरणी सीबीआयने मद्य व्यावसायिक विजय मल्ल्या यांचे घर, कार्यालये आणि बंद पडलेली किंगफिशर एअरलाइन्ससह पाच ठिकाणी छापे टाकून झडती घेतली. मल्ल्या यांची मुंबई, गोवा, बंगळुरू व अन्य ठिकाणांतील कार्यालये व निवास परिसर येथे झडत्या घेण्यात आल्याचे सीबीआय सूत्रांनी सांगितले.मल्ल्यांच्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे संचालक ए. रघुनाथन, विमान कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी आणि आयडीबीआय बँकेचे अज्ञात अधिकारी, तसेच स्वत: मल्ल्या यांच्याविरुद्ध फिर्याद नोंदविण्यात आल्याचे सीबीआय सूत्रांनी सांगितले.मल्ल्या यांना कर्ज देताना नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप आहे. सीबीआयच्या या कारवाईबाबत कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. सीबीआय सूत्रांनी सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे वसूल न होऊ शकलेल्या कर्जाच्या (एनपीए) प्रकरणी फौजदारी पैलूंचा तपास करण्याचा एक भाग म्हणून प्राथमिक अहवाल नोंदविण्यात आला आहे.सरकारी बँकांनी दिलेले कर्ज आणि त्यांची वसुली न होण्याची २७ प्रकरणे २०१३मध्ये नोंदली गेली. एकूण १७ बँकांच्या समूहाचे किंग फिशरवर ७ हजार कोटी रुपयांचे कर्ज शिल्लक आहे. त्यातील सर्वांत जास्त थकबाकी स्टेट बँकेची १६०० कोटी रुपयांची आहे.सीबीआयच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, भादंविच्या १२०-ब नुसार फौजदारी कटकारस्थान व भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली प्रकरण नोंदविण्यात आले आहे.
मल्ल्यांच्या घरावर सीबीआयचा छापा
By admin | Published: October 11, 2015 5:05 AM