नवी दिल्ली - नॅशनल हेराल्ड प्रकरणी सलग तीन दिवस काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. पुढील चौकशीसाठी सोमवारपर्यंतची वेळ देण्यात यावी असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. त्यांची ही मागणी ईडीने मान्य केली असून आता पुढील चौकशी सोमवारी केली जाणार आहे. याच दरम्यान आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांच्या भावाच्या घरी सीबीआयनं छापा टाकला आहे.
अशोक गहलोत यांचे भाऊ अग्रसेन गहलोत यांच्या जोधपूरच्या घरी दिल्लीहून आलेलं सीबीआयचे पथक दाखल झालं आहे. खत घोटाळा प्रकरणात अग्रसेन आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात ईडीने यापूर्वीच त्यांची चौकशी केली आहे.
शेतकऱ्यांना अनुदान म्हणून मिळाणाऱ्या म्यूरिएट ऑफ पोटाशची विदेशात निर्यात केल्याबद्दल कस्टम विभागानं त्यांच्यावर 60 कोटींचा दंड ठोठावला होता. 2007 ते 2009 या काळातील हे प्रकरण आहे. ईडीनेही या प्रकरणात त्यांच्या विरोधात कारवाई करत अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
राहुल गांधींची मागणी ED कडून मान्य
राहुल गांधी यांची मागणी मान्य करत ईडीनं त्यांना नवं समन बजावलं आहे, तसंच सोमवारी चौकशीसाठी बोलावलं आहे. सक्तवसूली संचालनालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 20 जून रोजी नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या तपासाच्या चौकशीसाठी येण्यासाठी नवीन समन्स जारी केलं आणि त्यांची आई आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आजारपणाचा विचार करून संस्थेनं त्यांची विनंती मान्य केल्याचं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं.
बुधवारी त्यांना त्यांच्या यंग इंडियामधील हिस्स्याशी निगजीत डॉक्युमेंट्सच्या आधारावर प्रश्न विचारण्यात आले. ईडीद्वारे त्यांना जवळपास 35 प्रश्न विचारण्यात आले. बुधवारी देखील ईडीनं त्यांनी जवळपास 10 तास चौकशी केली. दरम्यान, राहुल गांधी यांच्या चौकशीच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. यापूर्वीही पोलिसांनी काँग्रेसच्या काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.