नवी दिल्ली - उन्नाव बलात्कार पीडितेच्या कारला झालेल्या अपघाताची चौकशी सीबीआयने करावी यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केंद्र सरकारला विनंती केली आहे. पीडित महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे.
कार अपघातानंतर उन्नाव पीडितेची अवस्था सध्या गंभीर आहे. लखनऊच्या केजीएसी रुग्णालयाच्या डॉक्टरांचे म्हणणं आहे की, अपघातामुळे महिलेच्या शरीराला जबरी दुखापत झाली आहे. त्यामुळे तिला सध्या व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलंय. तसेच तिच्या शरीराच्या अनेक भागात फ्रॅक्चरदेखील करण्यात आलं आहे.
भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर पीडित महिलेच्या गाडीला अपघात करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या अपघातात पीडित महिलेसोबतच तिची काकी, मावशी तसेच कोर्टात पीडितेची बाजू मांडणारे वकीलही गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर क्रामा सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.
दरम्यान, हा अपघात नसून घातपात असल्याची शंका उपस्थित करण्यात येत होती. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आज या प्रकरणी बलात्कार प्रकरणातील आरोपी असलेले भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर, त्यांचा भाऊ मनोज सिंह सेंगर आणि अन्य आठ जणांविरोधात, हत्या, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कृत्य आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात सीबीआयनं भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेंगरला ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्याविरोधात तीन गुन्हे दाखल देखील करण्यात आले होते. भारतीय दंडसंहितेच्या कलम 363 (अपहरण), 366 (महिलेचे अपहरण), 376 (बलात्कार), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि अल्पवयीन मुलांच्या लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नेमके काय आहे प्रकरण? भाजपा आमदार कुलदीपसिंग सेंगर व त्यांच्या साथीदारांनी जून 2017 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीनं केला आहे. याप्रकरणी न्याय मिळावा यासाठी युवती व तिच्या कुटुंबीयांनी रविवारी (8 एप्रिल 2018) मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला होता. या वेळी युवतीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांना पोलीस कोठडीत रविवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागले. परंतु, उन्नाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान ते मरण पावले होते.