CBI Summoned Satya Pal Malik: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना जुन्हा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने तोंडी समन्स पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलिक यांना 27 आणि 28 एप्रिल रोजी एजन्सीने हजर राहण्यास सांगितले आहे. यासंदर्भात सीबीआयने अद्याप दुजोरा दिलेला नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील दोन मोठ्या प्रकल्पांमधील अनियमिततेबाबत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सीबीआयने सत्यपाल मलिक यांना समन्स बजावले आहे. दोन फायलींवर स्वाक्षरी करण्यासाठी आपल्याला 300 कोटींची ऑफर मिळाल्याचा दावा मलिक यांनी केला होता. सीबीआयने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही त्यांची चौकशी केली होती.
'पुलवामा हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार' : सत्यपाल मलिक
काही दिवसांपूर्वी सत्यपाल मलिक यांनी यांनी मोठा दावा केला होता. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावरच्या पुलवामा भागात सीआरपीएफच्या जवानांच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. एका कारमध्ये असलेल्या सुसाईड बॉम्बरने थेट जवानांच्या ट्रकला धडक दिली. यामध्ये तब्बल 40 CRPF जवान शहीद झाले होते. ही घटना सरकारच्या चुकीमुळे झाल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. तसेच, पंतप्रधान मोदींनी त्यावेळी मला गप्प राहायला सांगितले, असेही ते म्हणाले. त्यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.