नवी दिल्ली : वादग्रस्त स्टिंग सीडी प्रकरणाच्या चौकशीसाठी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना सीबीआयने समन्स बजावून सोमवारी जबाबासाठी हजर राहण्यास सांगितले आहे. या सीडीमध्ये रावत बंडखोर काँग्रेस आमदारांसोबत सौदेबाजीसाठी मध्यस्थाशी संभाषण करीत असल्याचा आरोप आहे.राज्य सरकारच्या शिफारशीवरून या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली होती आणि केंद्राने या संदर्भात अधिसूचना काढली होती. उत्तराखंडात सध्या राष्ट्रपती राजवट आहे. रावत यांना गेल्या २८ मार्चला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जायचे होते. त्याच्या दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा देण्याच्या बदल्यात रावत यांनी त्यांना लाच देऊ केली होती, असा आरोप केला होता.आरोपाच्या पुष्ठ्यर्थ त्यांनी एक स्टिंग आॅपरेशनचा व्हिडीओही जारी केला. एका खासगी वृत्तवाहिनीच्या मुख्य संपादकाने हा व्हिडीओ तयार केला होता. या सीडीमध्ये रावत त्यांच्याविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सदर पत्रकारासोबत सौदेबाजी करीत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, रावत यांनी गेल्या आठवड्यात या वादग्रस्त सीडीत आपली उपस्थिती कबूल केली होती. (वृत्तसंस्था)
हरीश रावत यांना सीबीआयचा समन्स
By admin | Published: May 06, 2016 1:52 AM