नवी दिल्ली: सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेला वाद आता रस्त्यावर आला आहे. आज सकाळी सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा यांच्या घराजवळून चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या चारही जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. सध्या पोलीस या चौघांची चौकशी करत आहेत. आज सकाळी चार जण आलोक वर्मा यांच्या घराबाहेर गोंधळ घालत होते. यानंतर वर्मा यांच्या खासगी सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडलं आणि घरात नेऊन त्यांची चौकशी केली. यानंतर पोलीस दाखल झाले. त्यांनी चारही जणांना ताब्यात घेतलं. या चौघांकडे गुप्तचर विभागाची (आयबी) ओळखपत्रं सापडल्याचं वृत्त 'आज तक'नं दिलं आहे. पोलीस सध्या या चौघांची अधिक चौकशी करत आहेत. या चौघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं वर्मा यांच्या खासगी सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडलं होतं. पोलिसांनी चौघांकडून मोबाईल जप्त केले आहेत. या चौघाकडे असलेल्या आयबीच्या ओळखपत्रांवर त्यांच्या पदाचा उल्लेख आहे. हे चौघेजण काल रात्री दोन गाड्यांमधून आलोक वर्मा यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले. सीबीआय प्रमुख आलोक वर्मा आणि सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानं काल मोदी सरकारनं या दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरुन हटवलं. केंद्रीय दक्षता आयोगाच्या सल्ल्यानं सरकारनं ही कारवाई केली. दोन्ही अधिकाऱ्यांवरील आरोपांची चौकशी होईपर्यंत त्यांना पदभार स्वीकारता येणार नाही.