नवी दिल्ली : सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा हे सच्चे व प्रामाणिक अधिकारी असून, विशेष संचालक राकेश अस्थाना हे भ्रष्ट अधिकारी आहेत. आलोक वर्मा हे भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे काम अतिशय प्रामाणिकपणे करीत होते. अशा अधिकाऱ्याविरुद्ध केलेल्या कारवाईबाबत फेरविचार करावा, अशी विनंती भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.आलोक वर्मांप्रमाणेच सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनाही सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. अस्थाना हे भ्रष्ट असल्याचे काही पुरावे तुमच्याकडे आहेत का, असे विचारता सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, मी पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माझा पूर्ण विश्वास आहे. मात्र पंतप्रधानांच्या भोवती असलेले काही लोक मोदी व भाजपच्या हिताला बाधा येईल असे काम करीत आहेत. नीरव मोदी, मेहुल चोकसी विदेशात पळून गेले. विजय मल्ल्याप्रकरणी जारी केलेली लूकआऊट नोटीस शिथिल करण्यात आली. अशा घटनांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे ठाकलेल्या भाजपाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.>सरकारची अडचणसुब्रमण्यम स्वामी यांच्यासारख्या भाजपच्याच एका नेत्याने ही विधाने केल्याने मोदी सरकारची राजकीयदृष्ट्या अडचण होण्याची शक्यता आहे. आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहोत. पण आमच्यासोबत असलेलेच काही लोक माझ्या पाठीत खंजीर खुपसू पाहत आहेत, असेही स्वामी म्हणाले. त्यांनी कोणाचेही नाव घेण्याचे टाळले. स्वामी यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी, पी. चिदम्बरम यांच्यासह अनेकांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.
CBI Vs CBI: आलोक वर्मा प्रामाणिक, तर अस्थाना भ्रष्ट, सुब्रमण्यम स्वामी यांचा घरचा अहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 4:07 AM