नवी दिल्ली: सीबीआयच्या दोन सर्वोच्च अधिकाऱ्यांवरील आरोपांच्या चौकशी केंद्रीय दक्षता आयोगाच्या शिफारशीनुसार एसआयटीकडून केली जाणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबद्दलची माहिती दिली. सीबीआय देशाची प्रतिष्ठीत तपास यंत्रणा असून त्यांची विश्वासार्हता कायम राखण्यासाठी सरकार तत्पर आहे. मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी सरकारच्या कक्षेत येत नाही, असं जेटली यांनी म्हटलं. सीबीआयच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सध्या मोठं शीतयुद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि रवीशंकर प्रसाद यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी एकमेकांवर लाचखोरीचे गंभीर आरोप केले आहेत. देशातील प्रतिष्ठीत तपास यंत्रणेतील दोन शीर्षस्थ अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेला वाद अतिशय दुर्दैवी आणि वाईट आहे, असं जेटली म्हणाले. या प्रकरणाचा तपास कोण करणार, हा प्रश्न सरकारसमोर आहे. कारण हे प्रकरण सरकारच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे सीबीआयच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील आरोपांचा तपास सरकार करणार नाही, असं जेटलींनी स्पष्ट केलं. CBI vs CBI: काय आहे नेमकं प्रकरण?, कशावरून घडलं महाभारत?या प्रकरणात केंद्र सरकार फक्त निरीक्षक म्हणून काम करेल, असं अरुण जेटली म्हणाले. दोन्ही अधिकारी आरोपांची चौकशी करु शकत नाहीत, ही बाब कालच केंद्रीय दक्षता आयोगानं स्पष्ट केली आहे. या अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली या आरोपांची चौकशी केली जाऊ शकत नाही. त्यामुळेच जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत दोन्ही अधिकाऱ्यांना पदावरुन दूर करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास आता एसआयटी करेल. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही अधिकाऱ्यांना पदावर राहता येणार नाही,' असं जेटली म्हणाले.