नवी दिल्ली - केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागातील (सीबीआय) वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये पेटलेला वाद आता थेट न्यायालयात पोहोचला आहे. सीबीआयमधील दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी राकेश अस्थाना यांनीही दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्याविरोधातील याचिका रद्द करण्याची मागणी केली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने अस्थाना यांना तात्पुरता दिलासा दिला असून, त्यांच्यावरील कारवाईस 29 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा आणि दुसऱ्या क्रमांकावरील अधिकारी राकेश अस्थाना यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. दरम्यान, अस्थाना यांच्याविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना अस्थाना यांच्याकडील मोबाईल, लॅपटॉपसहमधील माहिती सुरक्षित ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
सीबीआयने मांस व्यापारी मोईन कुरेशी प्रकरणी आपलाच अधिकारी डीएसपी देवेंद्र कुमार यांना काल अटक केली होती. कुमार यांना आज पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयने कुमार यांची 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. तर कुमार यांच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला आहे. राकेश अस्थाना यांनी कुरेशी प्रकरणात चौकशी करत असलेल्या आरोपीकडून 2 कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयने स्वत:च्याच मुख्यालयात छापे टाकले होते. यावेळी देवेंद्र कुमारकडून 8 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. देवेंद्र यांच्या घरावरही रविवारी छापा टाकण्यात आला होता. आरोपी सना याने अस्थाना यांनी 2 कोटी रुपयांची लाच घेतल्याची माहिती चौकशीवेळी दिली होती. यानंतर कुमार याने हा जबाब फिरवून त्याचा दिल्लीत जबाब नोंदवल्याचे म्हटले होते. मात्र, सना या दिवशी हैदराबादला होता.