नवी दिल्ली - अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे तपास देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर, याप्रकरणी सीबीआयकडून रिया चक्रवर्तीची कसून चौकशी सुरू आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार रविवारी चौकशी दरम्यान रियाने सीबीआयच्या अधिकाऱ्यांशी वाद घातला. सुशांत प्रकरणावरुन सीबीआय चर्चेचा विषय बनली असतानाच, सनदी अधिकारी अशोख खेमका यांनी सीबीआयच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यापूर्वीही खेमका यांनी लोकायुक्त, लोकपाल आणि मुख्य माहिती आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते.
अशोख खेमका यांनी आता सीबीआयच्या भूमिकेवर आणि वार्षिक बजेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खेमका यांनी ट्विट करुन सीबीआयचे वार्षिक बजेट 800 कोटी रुपये असल्याचे म्हटले. तसेच, कुणाला शिक्षा झाली, कोण निर्दोष झाले, कोणाला फाशी देण्यात आली, जबाब कशारितीने निश्चित केला जातो? मागील वर्षांचा हिशेब तपासा, आजपर्यंत कोणत्या मोठ्या व्यक्तीला शिक्षा झाली? असे अनेक प्रश्न खेमका यांनी विचारले आहेत. हत्तीचे दाखवायचे दात वेगळे अन् खायचे दात वेगळे असे म्हणत सीबीआयच्या कार्यप्रणालीवर खेमका यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी खेमका यांनी भ्रष्टाचारासंदर्भात ट्विट करत कधी कधी एखाद्या कायद्यात सुधारणा करत भ्रष्टाचाराची निंदा केली जाते. विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराची सिस्टीम तयार केली जाते. तर, काही भ्रष्ट लोकच वास्तवात धन्य असल्याचं खेमका यांनी म्हटलं. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिनाच्या सेलिब्रेशनसंदर्भात ट्विट करत खेमका यांनी भ्रष्टाचाराची व्याख्याच सांगितली. राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केल्याने भ्रष्टाचार कमी होत नाह, तर त्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी किती पैसा खर्च झाला, याचा तपास केल्यास भ्रष्टाचार उघडकीस येतो, असे खेमका यांनी म्हटले आहे. आपल्या आयएएस कारकिर्दीत अशोक खेमका यांची तब्बल 53 वेळा बदली झाली आहे. त्यामुळे, कडक शिस्तीचा आणि भ्रष्टाचाराची चीड असलेला अधिकारी म्हणून खेमका यांच्याकडे पाहिले जाते.