दिल्ली मद्य धोरण प्रकरणात आज (गुरुवारी) सीबीआयने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के कविता यांना अटक केली. त्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयाने मंगळवारी (9 एप्रिल, 2024) भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के कविता यांची कोठडी 23 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.
तत्पूर्वी, सोमवारी न्यायालयाने कविता यांना अंतरिम जामीन देण्यासही नकार दिला. यावेळी, प्रथमदर्शनी असे दिसते की, त्यांनी साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. यामुळे त्यांना दिलासा दिल्यास त्या भविष्यातही असे करू शकतात, असे न्यायालयाने म्हटले होते.
महत्वाचे म्हणजे, कविता या दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात सहभागी असलेल्या दक्षिण गटाच्या सदस्य आहेत, असा आरोप ईडीने केला आहे.
ईडीचा दावा - ईडीने म्हटले आहे, कविता या दक्षिण गटातील एक महत्त्वाच्या सदस्य आहेत. ज्यांच्यावर मद्य परवान्यात मोठा वाटा मिळावा यासाठी दिल्लीतील सत्ताधारी पक्ष असलेल्या आम आदमी पार्टीला (आप) 100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे.
ईडीने आपचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे म्हणत, पक्षातील अनेक नेते आणि मंत्रीही यात सामील असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे, हे सर्व आरोप फेटाळून लावत, हे सर्व राजकीय सूडबुद्धीच्या भावनेने केले जात असल्याचे के कविता आणि आपने म्हटले आहे.