- शीलेश शर्मा नवी दिल्ली : सीव्हीसीचे के. व्ही. चौधरी, सीबीआयचे प्रभारी नागेश्वर राव आणि कार्मिक मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लोकरंजन यांनी ३ आॅक्टोबर रोजी रात्री आलोक वर्मा यांच्या दालनातून रात्री अडीच वाजता राफेल लढाऊ विमान घोटाळ्याचे दस्तऐवज गायब केले, कारण २४ आॅक्टोबर रोजी वर्मा या प्रकरणी एफआयआर दाखल करणार होते, असा दावा काँग्रेसने केला आहे.के. व्ही. चौधरी २३ रोजी डेन्मार्कच्या दौऱ्यावर जाणार होते. त्याची मंजुरीही पंतप्रधानांनी दिली होती. पण, अचानक चौधरी यांनी डेन्मार्क दौरा रद्द का केला? सीव्हीसीचे कार्यालय रात्री ८ पासून ते रात्री १२ पर्यंत का खुले होते? कुणाच्या आदेशावरुन कार्यालय उघडण्यात आले? सीबीआयचे प्रभारी नागेश्वर राव यांना रात्री ११ वाजता कसे समजले की, सीव्हीसी आदेश जारी करून त्यांना सीबीआयचे प्रभारी केले जाणार आहे? असेही सवाल काँग्रेसने केले आहे.काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गहलोत आणि रणदीप सुरजेवाला यांनी दावा केला की, आलोक वर्मा यांनी २४ रोजी सकाळी राफेल प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची तयारी केली होती. याचा थेट संबंध पंतप्रधान मोदी यांच्याशी आहे. प्रथम दिल्ली पोलीस सीबीआय मुख्यालयावर ताबा घेण्यासाठी गेले.रात्री २.३० वाजता के. व्ही. चौधरी व लोकरंजन सीबीआय मुख्यालयात जातात आणि आलोक वर्मा यांच्या रुममधून दस्तऐवज उचलून बाहेर पडले, तेव्हा त्यांच्यासोबत नागेश्वर रावही होते. रात्री अडीच वाजता आलोक वर्मा यांना दीर्घ सुटीवर पाठविण्यात आल्याचे कळविण्यात आले, असाही आरोप काँग्रेसने केला आहे.असा आहे घटनाक्रमरणदीप सुरजेवाला म्हणाले की, सीव्हीसी अॅक्टच्या कलम ८ अ नुसार २३ आॅक्टोबर रोजी रात्री ८ ते १२.३० च्या दरम्यान के. व्ही. चौधरी यांनी आलोक वर्मा यांना सुटीवर पाठविण्याचा आदेश जारी केला. तो रात्री १२.३० वाजता हा आदेश नॉर्थ ब्लॉकला पोहोचला. येथेच कार्मिक मंत्रालयाचे कार्यालय आहे.तिथे प्रतीक्षा करत असलेले सी. चंद्रमोळी यांच्या स्वाक्षरीने वर्मा यांना सुटीवर पाठविण्याचा आणि नागेश्वर राव यांना पदभार देण्याचा आदेश जारी झाला. हा आदेश १२ ते १२.३० च्या दरम्यान तयार करण्यात आला.११ ते १२ च्या दरम्यान त्याच रात्री मोदी यांनी नव्या नियुक्तीसाठी कॅबिनेटची बैठक बोलावून आदेशाला मंजुरी दिली.
CBIvsCBI: राफेलप्रकरणी आलोक वर्मा गुन्हा दाखल करणार होते; काँग्रेसचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 1:21 AM