नवी दिल्ली - सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं प्रमाण जवळपास पाच टक्क्यांनी वाढलं आहे. गेल्या वर्षी 86.07 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा हे प्रमाण 91.1 टक्क्यांवर गेलं आहे. या निकालात राजस्थानच्या तारू जैन हिने 500 पैकी 499 मार्क मिळवत पहिला क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे 13 विद्यार्थ्यांनी 499 मार्क मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे.
यंदा सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल आयसीएसई आणि अनेक राज्यांच्या बोर्डांआधी लागला आहे. सीबीएसई बोर्डाच्या निकालात यंदा त्रिवेंद्रम विभागानं बाजी मारली आहे. या विभागाचा निकाल तब्बल 99.85 टक्के इतका लागला आहे. तर 99 टक्क्यांसह चेन्नई दुसऱ्या, 95.89 टक्क्यांसह अजमेर तिसऱ्या क्रमांकावर आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या या परीक्षेला जवळपास 18 लाख विद्यार्थी बसले होते.
प्रथम क्रमांक पटकावलेल्या तारू जैनने आपणास खूप आनंद झाल्याचे म्हटले आहे. तारू जैन ही जयपूरमधील सेंट एंजेला सोफिया सीनीयर सेकंडरी स्कूलची विद्यार्थीनी असून आपण 4 ते 5 तास अभ्यास केल्याचं तिने सांगितले. तसेच, भविष्यात दिल्ली विश्वविद्यालयातून इकॉनॉमिक्स (ऑनर्स) करण्याची इच्छा तारूने व्यक्त केली आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने आपले आई-वडिल आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना दिले आहे. दरम्यान, या परीक्षेत 499 गुण घेऊन 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये 7 मुले असून 6 मुलींचा समावेश आहे. 498 गुणांसह 24 विद्यार्थी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर, 497 गुणांसह 58 विद्यार्थ्यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेत सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक आणि 57,256 विद्यार्थ्यांना 95 % पेक्षा अधिक गुण आहेत.