नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (यूपीएसई) बुधवारी यंदाच्या १०वीच्या परीक्षा रद्द करण्याचा तर १२वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, शाळा व उच्च शिक्षण सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीबीएसईच्या १०वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. ४ मे ते १४ जून दरम्यान होऊ घातलेल्या १२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. १ जून रोजी देशातील स्थितीचा आढावा घेऊन १२वीच्या परीक्षांच्या तारखा निश्चित केल्या जातील. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या १५ दिवस आधी त्याबाबत सूचित केले जाईल. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल म्हणाले की, यंदा सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना अकरावीत प्रमोट केले जाईल. यासाठी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन आणि प्रात्यक्षिकांचे गुण यांचा आधार घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्याबाबत सीबीएसई वस्तुनिष्ठ निकष निश्चित करणार आहे. जे विद्यार्थी विनापरीक्षा प्रमोट करण्याबाबत समाधानी नसतील त्यांना बोर्डाची प्रत्यक्ष परीक्षा देऊन आणखी चांगले गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करता येतील. यंदा १० वीसाठी सुमारे २१.५ लाख तर १२ वीसाठी १४ लाख विद्यार्थ्यांनी नाव नोंदविलेले आहे.कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला या परीक्षा सध्या न घेण्याची विनंती केली होती. शिवसेनेनेही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला पत्र लिहून या परीक्षांच्या तारखा बदलण्याची विनंती केली होती.या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी केलेल्या ऑनलाइन याचिकेवर देशातील सुमारे २ लाख विद्यार्थ्यांनी सह्या केल्या होत्या. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि पंजाब या राज्यांतील बोर्डांनी या आधीच आपल्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्गामुळे देशभरातील शाळा मागच्या मार्च महिन्यापासून बंद आहेत.
सीबीएसईच्या परीक्षा ऑनलाइन का नाही?राज्यातील किंवा देशातील बहुतांश सीबीएसई शाळा जिल्हा भागात, शहरी भागांत असून, सुसज्ज तंत्रज्ञान असलेल्या आहेत. अशा परिस्थितीत दहावीसारख्या महत्त्वाच्या वर्षाचे मूल्यमापन करण्यासाठी ऑनलाइन परीक्षांची यंत्रणा का नाही, असे प्रश्न काही तज्ज्ञ उपस्थित करत आहेत.