नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. या परीक्षेतील चार टॉपर्सनी 500 पैकी 499 मिळवण्याची किमया करून दाखविली आहे. विशेष म्हणजे या चार टॉपर्सपैकी तीनजण मुली आहेत. तर डीपीएस गुरुग्राम शाळेच्या प्रखर मित्तल याने सीबीएसईच्या परीक्षेत सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला. उर्वरित तीन मुलींमध्ये रिमझिम अग्रवाल (आरपी पब्लिक स्कूल), नंदिनी गर्ग (शामली) आणि श्रीलक्ष्मी (भवानी विद्यालय कोच्ची) यांचा समावेश आहे. यंदा देशभरातून यावर्षी एकूण 16 लाख 24 हजार 682 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 14 लाख 8 हजार 594 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालात ८८.६७ टक्क्यांसोबत मुलींनी बाजी मारली असून मुलांची टक्केवारी ८५.३२ आहे. मुलींचा उत्तीर्ण टक्का मुलांपेक्षा ३.३५ टक्के जास्त आहे. विभागनुसार, तिरुवनंतपूरममध्ये सर्वाधिक 99.60 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल चेन्नई विभागाने 97.37 टक्के आणि अजमेर विभागाने 91.86 टक्के अशी बाजी मारली आहे.
CBSE 10th Result 2018: या चार टॉपर्सना मिळाले 500 पैकी 499 गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 3:55 PM