नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचे निकाल गुरुवारी जाहीर झाला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मुलगा पुल्कीत केजरीवाल यानेही बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पुल्कीत केजरीवाल याला बारावीच्या परिक्षेत 96.4 टक्के मिळाल्याचे ट्विट केले आहे.
देशभरातील सर्व विभागांची सरासरी काढल्यास बारावीचा निकाल 83.4 टक्के इतका लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. 88.7 टक्के विद्यार्थिनींनी परीक्षेत यश मिळवले असून उत्तीर्ण झालेल्या मुलांचे प्रमाण 79.5 टक्के इतके आहे. या परीक्षेत हंसिका शुक्ला या विद्यार्थिनींने पहिला क्रमांक पटकावला आहे. हंसिकाबरोबरच करिश्मा अरोरा ही विद्यार्थिनीही परीक्षेत टॉपर ठरली आहे. या दोघींनाही 500 पैकी 499 गुण मिळाले आहेत.
यंदा 10 विभागात सीबीएसईची परीक्षा घेण्यात आली होती. पुढच्या वर्षी ती 16 विभागांमध्ये घेण्यात येईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली. यंदा त्रिवेंद्रम विभागानं बाजी मारली. या विभागातले तब्बल 98.2 टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. महाराष्ट्राचा समावेश असलेला चेन्नई विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई विभागातल्या 92.3 टक्के विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळाले. तर 91.78 टक्क्यांसह दिल्ली विभाग तिसऱ्या क्रमांकावर राहिला. हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या विद्यार्थिनी परीक्षेत पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या. या दोघींनाही 500 पैकी 499 गुण मिळाले.
(५०० पैकी ४९९ गुण... CBSE टॉपर हंसिकाचा एक गुण गेला कुठे?)
सीबीएसईचा निकाल आज जाहीर होणार असल्याची माहिती विद्यार्थी, पालकांना नव्हती. सीबीएसईचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती अचानक आज दुपारी आली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना आश्चर्याचा धक्का बसला. याआधी सीबीएसईचे निकाल विविध टप्प्यांमध्ये जाहीर व्हायचे. मात्र यंदा सर्व विभागांचे निकाल सीबीएसईकडून एकाचवेळी जाहीर करण्यात आले. जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी यंदा बारावीची परीक्षा दिली होती.