नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक बोर्डाने (सीबीएसई) केंद्रीय शिक्षकांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यासाठीच्या नोंदणीला आजपासून सुरुवात झाली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची लिंक ctet.nic.in या वेबसाईटवर कार्यरत करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक बनण्याच्या प्रतिक्षेत किंवा इच्छुक असलेल्या उमेदवारांनी सीबीएसई सी-टेट (C-TET) परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. यंदा देशातील 20 भाषांमध्ये ही परीक्षा होत असून 92 शहरामध्ये परीक्षांचे केंद्र असणार आहे.
सीबीएसईकडून उमेदवारांसाठी काही सूचनाही देण्यात आल्या आहेत. जे उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज दाखल करणार आहेत, त्यांनी सर्वप्रथम माहिती पुस्तक डाऊनलोड करुन घेण्याची सूचना सीबीएसई बोर्डाकडून देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट आहे. तर 30 ऑगस्ट सायंकाळी 3.30 वाजता परीक्षेच्या फी देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. सी-टेट परीक्षेसाठी 22 जूनपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होणार होती. मात्र, प्रशासकीय अडचणींमुळे ही भरतीप्रकिया काही दिवसांसाठी थांबविण्यात आली होती. तर केंद्रीय बोर्डाकडून 16 सप्टेंबर 2018 ही परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली होती. पण, अर्ज करण्याच्या मुदतीची तारीख बदलल्यामुळे या परीक्षेच्या तारखेतही बदल होण्याची शक्यता आहे.